
मुंबई, 24 ऑगस्ट (हिं.स.) - मराठीवरील प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन झाले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श - मुख्यमंत्री
मराठीवरील प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन शोकदायी असल्याची भावना व्यक्त करून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. शेख यांचा जीवनप्रवास मराठीच्या प्रेमाने भारलेला होता. एखाद्या भाषा शिक्षकाने त्या भाषेवर किती निखळ, प्रांजळ प्रेम करावे याचे प्रा. शेख मूर्तीमंत उदाहरण ठरल्या. शिक्षिका, लेखिका, भाषा शास्त्रातील संशोधन आणि अभ्यासक या नात्याने आयुष्यभर भाषाशास्त्रात रमल्या. मराठी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. यातूनच त्यांनी मराठी व्याकरणात प्रदीर्घ काळ संशोधन केले. अभिजात मराठी भाषेसोबतच, अन्य भारतीय भाषांचाही संशोधक म्हणून अभ्यास केला. अन्य भाषांबाबतही त्या तितक्याच जिव्हाळ्याने मांडणी करत. भाषेचे सौंदर्य खुलवून सांगणारी आणि सौष्ठव समजून देण्याची त्यांची शैली नव्या पिढीलाही भावली. शब्दांचे सौंदर्य आणि व्याकरणदृष्ट्या अचूक वापर याबाबत त्यांनी सहजसोप्या पद्धतीने मांडणी केली. या अंगाने त्यांनी केलेले लेखन, संशोधन मराठी भाषेच्या दृष्टीने अमूल्य ठेवा ठरावे असे आहे. निवृत्तीनंतरही प्रा. शेख भाषाशास्त्रातील संशोधन-अभ्यासात कार्यमग्न राहिल्या. त्यांच्या निधनाने भाषाशास्त्रात अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ही मराठी साहित्य क्षेत्रासह, भाषाशास्त्राची मोठी हानी आहे. प्रा. शेख यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुंबई, दि. 24 :- मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉ. यास्मिन शेख यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठी भाषा, भाषाशास्त्र आणि व्याकरणाच्या अभ्यासासाठी व संवर्धनासाठी समर्पित केले. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर 34 वर्षे अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आस्था आणि प्रमाण भाषेची जाण निर्माण केली. मुंबईतील एस.आय.ई.एस. महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’मध्ये आयएएसच्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्राचे अध्यापन केले.
बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकांच्या संपादनात त्यांनी सात वर्षे योगदान दिले. ‘कार्यात्मक व्याकरण’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. भाषाशास्त्र आणि व्याकरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने डॉ. अशोक केळकर सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला होता. ‘भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे,’ हा विचार डॉ. यास्मिन शेख यांनी आपल्या कार्यातून सातत्याने समाजासमोर ठेवला. मराठी बोलताना परकीय शब्दांचा अनावश्यक वापर टाळावा आणि ललित तसेच वैचारिक लेखनात प्रमाण भाषेचा वापर व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला. डॉ. यास्मिन शेख यांचा जीवनप्रवास हा सामाजिक सलोखा, वैचारिक समृद्धी आणि मराठी भाषेवरील निष्ठेचा अनोखा संगम होता. शतकभराचा समृद्ध जीवनप्रवास आणि मराठी भाषेसाठी केलेले त्यांचे अविरत कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी भाषेच्या क्षेत्रातील एक समर्पित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी