दिल्ली : मुसळधार पावसामुळे सुमारे दोन डझन उड्डाणे रद्द
दिल्लीकडे येणारी तब्बल 15 उड्डाणे करावी लागली डायव्हर्ट रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.) : दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राम आ
दिल्ली विमानतळाचे छायाचित्र


दिल्लीकडे येणारी तब्बल 15 उड्डाणे करावी लागली डायव्हर्ट

रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.) : दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबादमधील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. खराब हवामानाचा फटका हवाई वाहतुकीलाही बसला असून दिल्लीकडे येणारी सुमारे 15 उड्डाणे अन्य विमानतळांकडे वळवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणांहून दिल्लीकडे येणाऱ्या सुमारे 15 विमानांना प्रवासादरम्यानच मार्ग बदलून इतर विमानतळांवर उतरवण्याचे निर्देश देण्यात आले. यापैकी सर्वाधिक उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली. त्यानंतर काही उड्डाणे लखनौ आणि चंदीगड विमानतळांकडे वळवण्यात आली. उड्डाणांचे डायव्हर्जन सकाळी सुमारे 11 वाजता सुरू झाले आणि दुपारी 12.45 वाजेपर्यंत सुरू राहिले. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन दिल्ली विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी पूर्वसूचना जारी केली होती. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी किंवा प्रवास करण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या उड्डाणाची अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, पावसाचा परिणाम केवळ दिल्लीकडे येणाऱ्या विमानांवरच झाला नाही, तर दिल्लीहून होणाऱ्या उड्डाणांवरही मोठा परिणाम झाला. आतापर्यंत प्रस्थान करणाऱ्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक उड्डाणांना मोठा विलंब झाला असून, विलंबाचा सरासरी कालावधी सुमारे एक तास असल्याचे सांगण्यात येत आहे.याशिवाय, खराब हवामानामुळे सुमारे 2 डझन उड्डाणे रद्द करण्यात आली. मुसळधार पावसामुळे महामार्गांसह शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande