'कोल्हापूर फर्स्ट'तर्फे जिल्हाधिकारी विजय राठोड यांचा गौरव
कोल्हापूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। ‘महास्ट्राईड’ अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याने १०० टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ‘कोल्हापूर फर्स्ट’ व संलग्न विविध संस्थांच्या शिष्टमंडळान
‘कोल्हापूर फर्स्ट’ शिष्टमंडळ जिल्हाधिकारी  विजय राठोड यांचा सत्कार करताना


कोल्हापूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। ‘महास्ट्राईड’ अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याने १०० टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ‘कोल्हापूर फर्स्ट’ व संलग्न विविध संस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’चे चेअरमन सुरेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष गौरवपत्र फ्रेम करून जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वतंत्र पडताळणी संस्थेमार्फत प्रकल्पांची पूर्तता, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण, आर्थिक तरतूद, निधीचा प्रभावी वापर आणि उद्दिष्टपूर्ती अशा विविध निकषांवर करण्यात आलेल्या मूल्यांकनात कोल्हापूर जिल्ह्याने १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले आहे.

यावेळी बोलताना सुरेन्द्र जैन म्हणाले, “कोल्हापूर जिल्हा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्रात प्रथम आला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या यशाचे श्रेय जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी विजय राठोड आणि या कामासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांना जाते. त्यांचा गौरव करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.” ते पुढे म्हणाले, “२०२५-२६ मध्ये जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत कोल्हापूरने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता पुढील काळात कोल्हापूरचा विकास अधिक झपाट्याने व्हावा, यासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’तर्फे कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”

‘कोल्हापूर फर्स्ट’चे ब्रीदवाक्य ‘नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित कोल्हापूर घडवणे’ हे असून, त्यानुसार भविष्यातील पिढीच्या गरजा लक्षात घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांतील घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जैन यांनी सांगितले.

ते म्हणाले, “मागील काळात कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या बाबी मार्गी लागल्या आहेत. महालक्ष्मी विकास आराखडा, सर्किट बेंच, आयटी पार्कची उभारणी, नवीन औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाची प्रक्रिया आणि नुकतीच क्रिकेट स्टेडियमसाठी उपलब्ध झालेली जागा, या सर्व बाबी कोल्हापूरच्या भविष्यातील मोठ्या विकासाची दारे खुली करणाऱ्या आहेत.”

कोल्हापूरच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्याचा उल्लेख करत जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले. “मुख्यमंत्र्यांची विकासाची दृष्टी आणि कोल्हापूरच्या विकासासाठी घेतले जाणारे निर्णय महत्त्वाचे आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेत कोल्हापूर जिल्हाही विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “या उद्दिष्टासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. जिल्हा प्रशासन तसेच जिल्ह्यातील सर्व राजकीय नेतृत्व विकासाच्या भूमिकेत आमच्यासोबत आहे. सर्वांना कोल्हापूरचा विकास साधायचा आहे. या सामूहिक प्रयत्नांचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठीच आज आम्ही येथे आलो आहोत,” असेही जैन यांनी नमूद केले.

यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’ संलग्न संस्था कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, स्मॅक चे अध्यक्ष जयदीप चौगले, उपाध्यक्ष भरत जाधव, ऑ. सेक्रेटरी रणजीत जाधव आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande