
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। पंचायत समिती बदनापूर
येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
बदनापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळावा, मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि कोणतेही काम प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित राहू नये, या उद्देशाने बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी गावनिहाय सुरू असलेली विकासकामे, रस्ते व बांधकामाची कामे, कृषी विभागाच्या विविध योजना, ग्रामविकासाशी संबंधित कामे, महसूल विभागातील विषय, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, निधीची उपलब्धता, प्रलंबित प्रस्ताव तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांची अंमलबजावणी करताना कामाचा दर्जा आणि गुणवत्ता यामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये. संबंधित विभागांनी कामांना अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच प्रशासकीय पातळीवर प्रलंबित असलेल्या बाबींचा तातडीने निपटारा करावा, अशा स्पष्ट सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
तसेच ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंच यांनी समन्वयाने काम करावे. शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस बदनापूर तहसीलदार शंकर हंदेश्वर, पंचायत समिती गटविकास अधिकारी ज्योती राठोड, मुख्याधिकारी विशाल पाटील, माजी पंचायत समिती सभापती तथा बदनापूर नगरपंचायत नगरसेवक पद्माकर जऱ्हाड, माजी पंचायत समिती सभापती सुपडसिंग जागरवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व सरपंच उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis