
नवी दिल्ली , 24 ऑगस्ट (हिं.स.)।भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर दोन दिवसीय रशिया दौऱ्यासाठी रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. सोमवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यानंतर जयशंकर यांनी व्लादिमीर पुतिन यांच्यासह रशियाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतही सहभाग घेतला.
एस. जयशंकर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर आहेत. व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “मी माझ्या वक्तव्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छांनी करू इच्छितो. पंतप्रधान मोदी यांनी मला तुमच्यासाठी एक वैयक्तिक संदेश दिला आहे, जो मला तुम्हाला सुपूर्द करायचा आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या आंतर-सरकारी आयोगाची बैठक झाली आहे. एकूणच, मला वाटते की आमच्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी एक चांगला अहवाल आहे. आर्थिक सहकार्य, व्यापार, ऊर्जा, खते, अणुऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्येही मोठी प्रगती झाली आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यास मला आनंद होईल. एकूणच, आमचे आर्थिक सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.”
एस. जयशंकर यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले, “पंतप्रधान मोदी एससीईओ शिखर परिषदेत आपली भेट घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात आपले स्वागत करण्यासाठीही ते उत्सुक आहेत. तसेच योग्य वेळ आल्यावर आणि दोन्ही देशांच्या सोयीप्रमाणे वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्याचीही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आमच्याकडे सहकार्याचे एक अत्यंत मजबूत चित्र आहे.”
यावर्षी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १२ आणि १३ सप्टेंबर रोजी ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रशिया दौऱ्यादरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव यांच्यासोबत व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवतील.
एका अधिकृत निवेदनानुसार, एस. जयशंकर त्यांचे रशियन समकक्ष आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही नेते प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode