लातूर - शिक्षकांना एफएसएसएआय नोंदणीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी
लातूर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अन्नव्यवस्थेशी संबंधित (एफएसएसएआय) नोंदणी व वैधानिक वैयक्तिक जबाबदारीतून मुख्याध्यापक व शिक्षकांना मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमि
निवेदनाद्वारे मागणी


लातूर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अन्नव्यवस्थेशी संबंधित (एफएसएसएआय) नोंदणी व वैधानिक वैयक्तिक जबाबदारीतून मुख्याध्यापक व शिक्षकांना मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जळकोट तालुका शाखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिक्षक संघाने गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती जळकोट यांच्यामार्फत हे निवेदन शासनाकडे पाठविले आहे. शासनाच्या या योजनेंतर्गत शाळांना तांदूळ, डाळी, खाद्यतेल, मीठ, मसाले तसेच इतर आवश्यक साहित्य अधिकृत पुरवठा व्यवस्थेतून उपलब्ध करून दिले जाते तर प्रत्यक्ष भोजन तयार करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्त स्वयंपाकी, मदतनीस, महिला बचत गट अथवा संबंधित महिलांकडून पार पाडली जाते. दि. १८ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामांमध्ये पोषण आहार शिजविणे, धान्य साफ करणे, विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप करणे, स्वयंपाकगृह व भांडी स्वच्छ करणे आदी कामांचा समावेश असल्याचे शिक्षक संघाने निवेदनात नमूद केले आहे.

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करावे, अशी संघाची सातत्याने मागणी आहे.

त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी देण्यात आलेले सदरील नोंदणी तसेच अन्न व्यवसायाशी संबंधित वैयक्तिक वैधानिक जबाबदारीचे निर्देश तातडीने रद्द करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास शिक्षकांच्या वैधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष वीरभद्र देशमुख, राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपाध्यक्ष विजयकुमार तेलंग, तालुका सरचिटणीस महेश वासरे, तालुका उपाध्यक्ष टेकले पी. व्ही., नंदकिशोर काळे, ज्ञानेश्वर गंगनविडे, तालुका कोषाध्यक्ष रत्न ाकर टाकळे, तालुका सल्लागार संजय मद्देवाड, तालुका संपर्कप्रमुख सर्जेराव भांगे यांच्यासह शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महिला कार्यकारिणीच्या वतीने तालुका अध्यक्ष ज्योतीप्रभा सोनटक्के, तालुका उपाध्यक्ष मुसने संध्याराणी व तालुका सरचिटणीस शांता गुड्डा आदींचाही सहभाग आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande