लातूरकर नीतीशा जगताप यांनी स्वीकारला गुवाहाटीत वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार
लातूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। कर्तृत्वाच्या जोरावर लातूर जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल करणाऱ्या नीतीशा संजय जगताप यांनी आसाममधील गुवाहाटी येथे सीआयडी विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अत्यंत कमी वयात महत्त्वाची जबाबदारी स्
नितीशा जगताप


लातूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

कर्तृत्वाच्या जोरावर लातूर जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल करणाऱ्या नीतीशा संजय जगताप यांनी आसाममधील गुवाहाटी येथे सीआयडी विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अत्यंत कमी वयात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

नीतीशा यांच्या या उल्लेखनीय यशामागे त्यांचे कुटुंब, आजी, आई-वडील तसेच मोठी बहीण तनिषा संजय जगताप यांचे मोलाचे योगदान आणि प्रेरणा आहे. दोन्ही मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी जगताप कुटुंबाने पुण्यात स्थायिक होण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयातून सुरू झालेला दोन्ही बहिणींचा यशस्वी प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

नीतीशा यांनी भारतीय पोलीस सेवेत दाखल होत देशसेवेची जबाबदारी स्वीकारली आहे. तर त्यांची मोठी बहीण तनिषा यांनी पुण्यातील नामांकित सीओईपी महाविद्यालयातून बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्स येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या त्या जागतिक स्तरावरील नामांकित टेस्ला कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत.

कठोर परिश्रम, सातत्य आणि अपयशानंतरही नव्या जिद्दीने उभे राहण्याची मानसिकता यशाची खरी गुरुकिल्ली आहे, हे जगताप बहिणींनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. यशाला शॉर्टकट नसतो, तर त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, ध्येय आणि आत्मविश्वास आवश्यक असतो, असा संदेश त्यांच्या यशोगाथेतून मिळतो.

लातूरच्या या दोन्ही लेकींच्या दुहेरी यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लातूरकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नीतीशा आणि तनिषा यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande