
रायगड, 31 ऑगस्ट (हिं.स.) : रायगड विभागातील डाक सेवांशी संबंधित प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता ही डाक अदालत होणार असून, ग्राहकांनी आपल्या तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड विभागातील टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर आदी डाक सेवांशी संबंधित ज्या तक्रारी सहा आठवड्यांच्या कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या नाहीत, अशा तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे. संबंधित ग्राहकांनी आपली तक्रार दोन प्रतींमध्ये अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाकडे पाठवावी. तक्रार ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यालयास प्राप्त होणे आवश्यक आहे.
तक्रारीमध्ये तक्रार दाखल केल्याचा दिनांक, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे करण्यात आली त्या अधिकाऱ्याचे नाव व पद, तसेच तक्रारीशी संबंधित सविस्तर माहिती नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रलंबित डाक सेवांबाबतच्या तक्रारी असलेल्या ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह तक्रार सादर करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग राजेश रनाळकर यांनी केले आहे.
दरम्यान, यापुढे डाक अदालत त्रैमासिक ऐवजी दरमहा घेण्यात येणार आहे. ७ सप्टेंबर रोजी होणारी डाक अदालत या उपक्रमातील पहिली मासिक डाक अदालत असेल. त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी ३ वाजता डाक अदालत आयोजित केली जाणार आहे. पहिला सोमवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्यास पुढील दिवशी डाक अदालत घेण्यात येईल. याबाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)