
निर्णय रद्द करण्यासाठी हिंदू जनजागरण समिती मैदानात
कोल्हापूर, ३१ ऑगस्ट (हिंं.स.) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्या २२ वर्षांपासून शांततेत आणि उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीने या निर्णयाला विरोध केला आहे. गणेशोत्सव पूर्ववत सुरू करावा आणि उत्सव बंद करण्यामागील निर्णयाचा कायदेशीर आधार स्पष्ट करावा, अशी मागणी समितीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन तहसीलदार हनुमंत म्हेत्रे यांनी स्वीकारले. तसेच जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली.
समितीने निवेदनात म्हटले आहे की, एका बाजूला गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्याची भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील २२ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रशासकीय विरोधाभास का निर्माण करण्यात आला, असा सवालही समितीने उपस्थित केला आहे.
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar