
नाशिक, 07 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील खड्डे, वृक्षतोड, रखडलेली विकासकामे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार व प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू आहे, आंदोलनं झाली तरी प्रशासन ढिम्म आहे. सिंहस्थाच्या नावाखाली नाशिककरांना खड्ड्यात घातले जात आहे, अशी टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांसह मतदारांनाही टोला लगावला. हे सर्व सुरू असतानाही जर लोक त्याच पक्षाला निवडून देत असतील, तर मग भोगा, असे ठाकरे म्हणाले.
दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी, महाराष्ट्रात सक्षम कंत्राटदार नाहीत का? असा सवाल केला.
प्रत्येकाला फक्त कमिशनशी देणंघेणं आहे, असा आरोप करत त्यांनी विकासकामांच्या नियोजनावर टीका केली.राज ठाकरे म्हणाले, २००३ आणि २०१५ या दोन्ही कुंभमेळ्यांचा अनुभव आपल्या समोर आहे. २०१५ मध्ये विकासकामे झाली, मात्र नागरिकांना त्रास झाला नाही. आज मात्र संपूर्ण शहर खड्ड्यांनी व्यापले आहे. अपघातात नागरिकांचे जीव जात आहेत, तरी प्रशासनाला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही.स्मार्ट सिटी योजनेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. स्मार्ट सिटीचे काय झाले? शहराच्या विकासासाठी झालेल्या घोषणांचे पुढे काय झाले? अशी विचारणा त्यांनी केली.
चौकट
मला सांगितलेच नव्हते; भेट न झाल्याबद्दल दिलगिरी
पॅरा धावपटू दिलीप गावित यांची भेट न झाल्याच्या प्रकरणावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. दिलीप गावित आले आहेत, याची मला माहितीच नव्हती. मला सांगितले असते तर मी निश्चित त्यांची भेट घेतली असती. ते दोन तास थांबले आणि भेट झाली नाही, याबद्दल त्यांचा गैरसमज झाला. त्यांची भेट न झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ठाकरे म्हणाले. दिलीप गावित दिल्लीहून परतल्यानंतर त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
शिक्षण व्यवस्थेवरही साधला निशाणा
राज ठाकरे यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यापारीकरणावरही टीका केली. महाविद्यालयांपेक्षा कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवत आहेत, असे म्हणत त्यांनी क्लासेस आणि महाविद्यालयांच्या कथित संगनमतावर प्रश्न उपस्थित केले.
नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी या व्यवस्थेवर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, नैराश्य आणि आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI