
छत्रपती संभाजीनगर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। शहरात आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज माननीय उपमहापौर राजेश राऊत यांनी आढावा बैठक घेतली.
यापूर्वी घेण्यात आलेल्या बैठकीतील विषयांनुसार करण्यात आलेल्या कामांचा प्रगती अहवाल यावेळी सादर करण्यात आला. सदर अहवालाचा आढावा घेताना विविध विभागांच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये शहरातील मोकाट कुत्रे व मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त, स्वच्छता व्यवस्था, धूर फवारणी, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नाल्यांवरील ढापे दुरुस्ती व बसविणे, विद्युत पोलवरील बंद असलेल्या लाईटची दुरुस्ती, तसेच गणेशमूर्ती विसर्जन स्थळांची पाहणी व विसर्जन पॉइंटची आवश्यक व्यवस्था याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. सणासुदीच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमहापौर राजेशजी राऊत यांनी दिल्या.
शहरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देऊन गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दिवाळी सण शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीस नगरसचिव केशव कानपुडे, स्वच्छता व अतिक्रमण सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, नगर अभियंता सय्यद सउद, पाणीपुरवठा अभियंता बगळे, विद्युत अभियंता कोमल गावंडे, अग्निशामन अधिकारी पानपट्टे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis