
कोल्हापूर, १ सप्टेंबर (हिं.स.) : कोल्हापूरने नेहमीच राज्याला वेगळी ओळख दिली आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे-मुंबईऐवजी कोल्हापुरातील गणेशोत्सव संपूर्ण राज्यासाठी ‘आदर्श गणेशोत्सव’ म्हणून ओळखला जावा, अशी अपेक्षा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शांतता समितीच्या सदस्यांची समन्वय बैठक सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा कोल्हापूरने जपला आहे. नियमांचे पालन करणारा जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासह विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करावेत. मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होणार नाही तसेच लेझरचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणतेही गालबोट न लागता उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गणेशोत्सवातून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे आवाहन केले. गरजू आणि गरीब नागरिकांना आवश्यक ती मदत करावी, असेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून ‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर’ या भूमिकेतून उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. गणेश मंडळांचे वीज वितरण कंपनीकडे जमा असलेले डिपॉझिट सात दिवसांत परत करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले की, १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील बहुतांश खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले जाईल. कोल्हापुरातील गणेशोत्सवाने राज्याला नवी दिशा द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. गणेशमूर्तीचा आकार, डॉल्बीचा आवाज, मंडळाभोवतीची गर्दी किंवा मोठा मंडप यावर श्रद्धा ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवात लेझरचा वापर करू नये. डीजेवर पूर्ण बंदी नसली तरी ध्वनिमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅसला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. महाप्रसादाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात येईल. उत्सव काळात पोलीस विभागाची २४ तास नियंत्रण कक्षाची सुविधा कार्यरत राहणार आहे. गणेशमूर्तीच्या आगमन-निर्गमनावेळी सुरक्षित स्ट्रक्चर उभारण्याची जबाबदारी मंडळांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
सर्व गणेश मंडळांसाठी पोलीस प्रशासन समान कायदा लागू करणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी प्रत्येक मंडळाने दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. महाद्वार रोडवरील मिरवणुकीवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील मंडळांनी पर्यायी मार्गांचा विचार करावा, असेही त्यांनी सुचविले.
बैठकीत शांतता व दक्षता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या. मिरवणुकीदरम्यान महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्यावा, मिरवणूक मार्गावरील विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवावी, महाद्वार रोडवरील मिरवणूक रेंगाळू नये यासाठी उपाययोजना कराव्यात आणि सर्व मंडळांना समान न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. गणेश आगमनापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar