
लातूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
महिलांच्या आरोग्य-फिटनेस चळवळीतील योगदानाची दखल
महिलांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि योगाची जनजागृती निर्माण करून त्यांना निरोगी जीवनशैलीची दिशा देणाऱ्या योग प्रशिक्षिका सौ. मोहिनी दिपरत्न निलंगेकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने त्यांना ‘लातूर भूषण पुरस्कार २०२५-२६’ जाहीर करण्यात आला आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी गेल्या वर्षभरापासून सौ. मोहिनी निलंगेकर या लातूर येथील बुद्ध गार्डन परिसरात दररोज सकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत मोफत योग व फिटनेस वर्ग घेत आहेत. या उपक्रमातून परिसरातील शंभरहून अधिक महिला नियमितपणे योग, व्यायाम आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. योग व नियमित व्यायामाच्या माध्यमातून महिलांना आरोग्यपूर्ण जीवनशैलीची सवय लावण्याबरोबरच विविध आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
‘स्वतः निरोगी राहा आणि इतरांनाही निरोगी राहण्यासाठी प्रेरणा द्या’ या भावनेतून सुरू झालेली त्यांची ही मोफत आरोग्य चळवळ महिलांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहे. कोणतेही शुल्क न घेता सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे बुद्ध गार्डन परिसरात महिलांच्या आरोग्य-जागरूकतेला नवी दिशा मिळाली आहे.
योग प्रशिक्षिका म्हणून कार्य करत असतानाच सौ. मोहिनी निलंगेकर या श्री श्री रविशंकर विद्यालयात ड्रॉइंग शिक्षिका म्हणूनही कार्यरत आहेत. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांत त्या योगदान देत आहेत. त्यांच्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्याची विविध वर्तमानपत्रांनीही वेळोवेळी दखल घेत त्यांच्या उपक्रमाला प्रसिद्धी दिली आहे.
या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, जिल्हा शाखा लातूरच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘लातूर भूषण पुरस्कार सोहळ्यात’ त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता दयानंद सभागृह, लातूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून आमदार अभिमन्यू पवार या सोहळ्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी प . पु.श्री विद्यानंद सागर महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच मंत्री, आमदार, खासदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
महिलांच्या आरोग्यासाठी निःस्वार्थपणे सुरू असलेल्या मोफत योग-फिटनेस उपक्रमाला मिळालेला हा सन्मान म्हणजे सौ. मोहिनी दीपप्रत्न निलंगेकर यांच्या कार्याचा गौरव तर आहेच; पण लातूरमध्ये महिलांच्या आरोग्यविषयक चळवळीला मिळालेली प्रेरणादायी पावतीही आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis