लातूर जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान
लातूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्ण
अभियान


लातूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार असून, जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी लातूरचे धर्मादाय सह आयुक्त विद्याधर शे. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त (धर्मादाय रुग्णालय) एस. जे. निंबाळकर यांनी उपस्थित विश्वस्त, प्रशासक आणि आरोग्य सेवकांना मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी गणेश मंडळांच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच सर्व गणेश मंडळांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.

वर्गणी संकलनासाठी धर्मादाय कार्यालयाची परवानगी आवश्यक

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात वर्गणी संकलनाबाबतही धर्मादाय कार्यालयाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ४१(क) नुसार गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय कार्यालयाची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक आहे.

त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी वर्गणी संकलनापूर्वी आवश्यक परवानगी घ्यावी. विनापरवानगी वर्गणी संकलन करणाऱ्या मंडळांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस. जे. निंबाळकर यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande