
परभणी, 11 सप्टेंबर (हिं.स.)
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी धर्मापुरी येथील शाळेला भेट देऊन शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी उपस्थित राहून ‘चला शिकूया प्रयोगातून विज्ञान’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रयोग पाहिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली. वेळेत सुरू असलेले ऑनलाइन स्पोकन इंग्लिश वर्ग तसेच रात्री विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या अभ्यासिकेचे त्यांनी कौतुक केले. अभ्यासिकेत पालकांचीही उपस्थिती असून दोन शिक्षक नियमितपणे देखरेख करतात. नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वच्छता, पिण्याचे पाणी व किचन शेडची पाहणी करून आवश्यक सुधारणा सुचविल्या. गाव पातळीवरील यंत्रणेने शाळेला शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, जिल्हा परिषद सभागृहात केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी व विषय साधन व्यक्तींची बैठक घेऊन परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत त्यांनी सूचना दिल्या. पीजीआय व निपुण उपक्रमातील कामगिरी उंचावण्यासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार, अमोल निळेकर, शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजुरके, सविता बिरगे, संजय ससाणे, अमोल देशपांडे, अधिव्याख्याता प्रा. गणेश शिंदे, उमेश राऊत, संतोष ठाकूर, अभय परिहार, अतुल चंद्रमोरे, राम नाईकनवरे, जोत्स्ना धुतमल, संतोष सेलूकर, प्रसन्न भावसार, ओंकार कुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis