रायगड : बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट
नेरळ-कशेळे बस बंद; विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत
Bus passes for 250 students, yet bus service suspended!


रायगड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। : नेरळ-वाकस मार्गे कशेळे जाणारी विद्यार्थ्यांसाठीची बससेवा शुक्रवार, ११ सप्टेंबरपासून बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची पुन्हा पायपीट सुरू झाली आहे. बससेवा बंद झाल्यामुळे सुमारे २५० विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

नेरळ परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन, किसान क्रांती संघटना आणि आरपीआय आठवले गट यांच्या माध्यमातून परिवहन मंडळाकडे अर्ज करण्यात आले होते. त्यानंतर ३ ऑगस्टपासून नेरळ-वाकस मार्गे कशेळे बससेवा सुरू करण्यात आली. बससेवा सुरू झाल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी बसचे पास काढले होते.

विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी होणारी पायपीट कमी व्हावी, हा या सेवेमागील मुख्य उद्देश होता. सुरुवातीला प्रवाशांसाठीही अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवसांनी प्रवासी फेऱ्या बंद करून केवळ विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू ठेवण्यात आली. आता ही सेवाही बंद झाल्याने विद्यार्थ्यांसमोर पुन्हा वाहतुकीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

विशेषतः पाच किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बससेवा बंद झाल्याचा मोठा फटका बसत आहे. बसची प्रतीक्षा करूनही सेवा उपलब्ध न झाल्याने काही विद्यार्थी घरी परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

दरम्यान, काही रिक्षाचालक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी इको रिक्षामध्ये घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारीही विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्थाही अपुरी पडत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिवहन मंडळाने तातडीने लक्ष घालून नेरळ-कशेळे बससेवा पूर्ववत करून ती नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. पालकांनीही प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande