
पालकमंत्री संजय सिरसाट यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, १२ सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आज घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीस विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, सहआयुक्त मंजुषा मिसकर आदी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन, शुभारंभ तसेच लोकार्पण कार्यक्रमांचे नियोजन विविध विभागांकडून करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महानगरपालिका तसेच विभागीय क्रीडा संकुलातील विविध विकासकामांचा समावेश आहे. याशिवाय शहराच्या अन्य भागांतही विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
मुख्य शासकीय समारंभाच्या अनुषंगाने आवश्यक तयारी, कार्यक्रमाचे नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेबाबत पालकमंत्री संजय सिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आपापली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी, तसेच आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री सिरसाट यांनी दिले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis