
अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.)
अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतर्फे ‘पर्यावरणपूरक गणेश मंडळ’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी नोंदणीकृत गणेश मंडळांचे विविध निकषांवर मूल्यांकन करून विजेत्या मंडळांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मंडळाला ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला २१ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या मंडळाला ११ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळाची २०२६ च्या गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या झोन कार्यालयात नोंदणी तसेच पोलिस विभागाची परवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.मंडळाची मूर्ती मातीची असावी तसेच अधिकृत मूर्ती विक्रेत्याकडून खरेदी केल्याची पावती असणे आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषणासह परवानगीपत्रातील सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. सजावटीमध्ये सिंगल यूज प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करता येणार नाही.मंडळांच्या देखाव्यांमध्ये प्लास्टिकबंदी, स्वच्छता, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन तसेच स्वदेशी वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती करणाऱ्या संकल्पनांना प्राधान्य दिले जाणार आहे. ईको-फ्रेंडली पेंडॉल, वेस्ट थीमॅटिक मंडळ आणि ग्रीन पेंडॉल यांचाही विचार मूल्यांकनात केला जाणार आहे. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर जवानांना समर्पित देशभक्तीपर देखाव्यांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.नोंदणीकृत मंडळांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरून स्पर्धेत सहभाग नोंदवावा. सहभागाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ असून, शहरातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी