

- ऑगस्ट क्रांती मैदान येथून ५ बसेसचे कोकणाकडे प्रस्थान
- २०० हून अधिक भाविकांनी बसने केला प्रवास
मुंबई, 12 सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे, यासाठी लोढा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष ‘नमो एक्स्प्रेस’ची व्यवस्था केली. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वरून सकाळी ११ वाजून ५ मिनिटाने ट्रेन कोकणाकडे धावली. मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार श्री. अमित साटम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला आणि ट्रेनमधून १५०० हून अधिक गणेशभक्त कोकणाकडे रवाना झाले.
‘नमो एक्स्प्रेस’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडीपर्यंत धावणार असून, गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आपल्या कुटुंबीयांसोबत आणि गावच्या बाप्पासोबत गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याचा आनंद प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हक्काचे आसन मिळाल्यानंतर गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले. विशेष रेल्वे रवाना होताच संपूर्ण स्थानक परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. बाप्पाच्या आगमनासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या आनंदाला यावेळी अक्षरशः उधाण आले होते.
गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी माणसाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाता यावे, आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करता यावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे. गणेशोत्सव जवळ येताच प्रत्येक मुंबईकराला आपल्या गावाची आणि आपल्या माणसांची ओढ लागते. हीच भावनिक नाळ लक्षात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे आणि बससेवेची व्यवस्था करण्यात येते. मुंबईतून कोकणाकडे रवाना होताना गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच या उपक्रमाची खरी पावती आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजता भाजपच्या वतीने आणखी एका विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना अतिरिक्त वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पाच विशेष बस रवाना करण्यात आल्या. दक्षिण मुंबई परिसरातील सुमारे २०० चाकरमान्यांनी या बसमधून प्रवास केला. ‘गणपती बाप्पा मोरया’ जयघोषाने बस कोकणाकडे धावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी