
बीड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। वाकनाथपूर येथे झालेल्या शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी बैठकीत पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, मागील अतिवृष्टीतील घोषणेनुसार हेक्टरी १७ हजार रुपये पीकविमा द्यावा, २०२० सालचा थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी हक्क मोर्चाचे डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis