
स्मशानभूमीपर्यंत पूल नसल्याने ग्रामस्थांची मरणयातना
पावसाळ्यात मृतदेह नेणेही धोकादायक
यवतमाळ, १५ सप्टेंबर (हिं.स.) : विकासकामांच्या घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडत असताना घाटंजी तालुक्यातील खापरी गावात मात्र माणसाच्या अखेरच्या प्रवासासाठीही सुरक्षित वाट उपलब्ध नसल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. जिवंतपणी नागरी सुविधांचा अभाव सहन करणाऱ्या ग्रामस्थांना आता मृतदेह स्मशानभूमीत नेतानाही चिखलातून वाट काढावी लागत आहे. नाल्याच्या पलीकडे असलेल्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पूल नसल्याने अंत्ययात्राच ग्रामस्थांसाठी मरणयातना ठरत आहे.
खापरी गावाच्या काठाने नाला वाहतो आणि त्याच्या पलीकडे गावाची स्मशानभूमी आहे. या दोन्ही भागांना जोडण्यासाठी पूल नसल्याने ग्रामस्थांना नाल्याच्या पात्रातूनच मार्ग काढावा लागतो. नाल्यात नेहमी पाणी नसले तरी चिखलाचा अडथळा कायम असतो. त्यामुळे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून घसरत, सांभाळत पुढे जाण्याची वेळ नातेवाईकांवर येते. अंत्यसंस्काराच्या दुःखद प्रसंगी त्यांना अशा प्रकारे मोठी कसरत करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होते.
चिखलाचे प्रमाण वाढल्याने नाल्यापलीकडे पार्थिव नेणे धोकादायक, तर अनेकदा अशक्य होते. त्यामुळे नाईलाजाने नातेवाईकांना मृतदेह तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटंजी शहरातील स्मशानभूमीत न्यावा लागतो. गावातच स्मशानभूमी असताना केवळ पूल नसल्यामुळे अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे शहरालगत असलेली खापरी ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावात मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता का भासते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या पुलाचा प्रश्न आजचा नसून गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून पुलाच्या उभारणीची मागणी केली जात आहे. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीतील राजकीय गटबाजी आणि प्रशासकीय टोलवाटोलवीमुळे हा प्रश्न लांबणीवर पडल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
इतर विकासकामांना काही काळ विलंब झाला तरी तो सहन करता येईल; मात्र स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग नसणे ही प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी खापरी गावातील परिस्थितीची तातडीने पाहणी करून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल उभारण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी