
डीजे बंदीचे आदेश धुडकावणे भोवले
यवतमाळ, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
शासनाच्या तसेच प्रशासनाच्या डीजे वापराबाबतच्या प्रतिबंधात्मक आदेशांना केराची टोपली दाखवत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून दहीहंडीचा उत्सव साजरा करणे उमरखेड शहरातील दोन आयोजकांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी दोन स्वतंत्र घटनांमध्ये दहीहंडीच्या आयोजकांसह डीजे ऑपरेटरविरुद्ध आज गुन्हे दाखल केले आहेत. उमरखेड शहरात शनिवारी महाराष्ट्र बँकेसमोरील मैदानावर सिद्धेश्वर मित्र मंडळातर्फे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या आकाराचे डीजेसदृश्य ४ ते ५ फूट उंचीचे बॉक्स तसेच केबलला लटकवून सहा बॉक्स लावण्यात आले होते. रात्रीपर्यंत मोठ्या आवाजात साउंड सिस्टिम सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी आयोजकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची तसेच उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड यांनी ९ सप्टेंबर रोजी काढलेल्या डीजे वापरावरील प्रतिबंधात्मक आदेशाची माहिती दिली. तसेच आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट करून डीजे बंद करण्याबाबत सूचना देण्यात आली. आयोजकांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये लेखी नोटीसही देण्यात आली. मात्र, त्यानंतरही आदेशाचे पालन न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल चंदन जाधव यांच्या फिर्यादीवरून जयस्वीन हरी घनघाव (रा. फैल, उमरखेड) आणि विनायक पोहुरकर (रा. चौबारा चौक, उमरखेड) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, रविवारी (ता. १३) जिल्हा परिषद मुलांची शाळा मैदान, पुसद रोड, उमरखेड येथे स्व. प्रमोद महाजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातही मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टिमचा वापर करण्यात आला. ४ ते ५ फूट उंचीचे मोठे बॉक्स तसेच स्टेजच्या दोन्ही बाजूंना लटकवलेले तब्बल १२ बॉक्स लावण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी आयोजक तसेच डीजे मालकाला प्रशासनाच्या डीजे बंदीच्या आदेशाची माहिती देऊनही आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल हनुमंत मुसळे यांच्या फिर्यादीवरून प्रणित मैड (रा. फैल, उमरखेड) आणि सुरेकांत लांडगे (रा. गणेशनगर, नांदेड, डीजे ऑपरेटर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी