प्रलंबित महसुली दावे व अपिलांवर तडजोडीसाठी विशेष उपक्रम; १७ सप्टेंबरला पहिली लोक अदालत
जळगाव, १५ सप्टेंबर (हिं.स.) : महसूल व वन विभागाच्या परिपत्रकानुसार जळगाव जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहस
कोर्ट लोगो


जळगाव, १५ सप्टेंबर (हिं.स.) : महसूल व वन विभागाच्या परिपत्रकानुसार जळगाव जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांच्या स्तरावरील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या महसुली दावे व अपिलांचा समावेश करण्यात येणार आहे.

या अभियानासाठी जिल्ह्यातील विविध महसूल कार्यालयांमध्ये लोक अदालतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी चोपडा, पारोळा, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, जामनेर, यावल, भडगाव, भुसावळ, पाचोरा, जळगाव, बोदवड, रावेर आणि चाळीसगाव येथील तहसील कार्यालयांमध्ये प्रथम महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.याच दिवशी पाचोरा, एरंडोल, अमळनेर, भुसावळ आणि चाळीसगाव येथील उपविभागीय कार्यालयांमध्येही महसूल लोक अदालत होणार आहे.तसेच ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अमळनेर तहसील कार्यालय तसेच फैजपूर आणि जळगाव उपविभागीय कार्यालयांमध्ये, तर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्रथम महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

ज्या अर्धन्यायिक न्यायालयात अथवा कार्यालयात महसुली दावा प्रलंबित आहे, त्या ठिकाणी संबंधित दोन्ही पक्षकारांनी त्यांच्या विधीज्ञामार्फत ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यात तडजोडीसाठी संबंधित कार्यालयाकडे विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.‘प्रपत्र-अ’मधील अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रलंबित महसुली प्रकरणांतील पक्षकारांनी या अभियानाचा लाभ घेऊन तडजोडीद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande