यवतमाळ : नेर शहरात भटक्या श्वानांची दहशत
दोन दिवसांत अनेकांना चावा; शासकीय रुग्णालयात अँटी-रेबीज लस अपुरी यवतमाळ, १५ सप्टेंबर (हिं.स.) : नेर शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, पिसाळलेल्या श्वानांनी अवघ्या दोन दिवसांत अनेक नागरिकांना चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण नि
नेर शहरात श्वानांचा कहर अनेकांना चावा; रुग्णालयात लशींचा तुटवडा


दोन दिवसांत अनेकांना चावा; शासकीय रुग्णालयात अँटी-रेबीज लस अपुरी

यवतमाळ, १५ सप्टेंबर (हिं.स.) : नेर शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, पिसाळलेल्या श्वानांनी अवघ्या दोन दिवसांत अनेक नागरिकांना चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींपैकी काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले, तर काहींना अँटी-रेबीज लस घेण्यासाठी यवतमाळ येथे जावे लागले.

नेर येथील शासकीय रुग्णालयात पुरेशा प्रमाणात अँटी-रेबीज लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना लसीकरणासाठी यवतमाळ गाठावे लागत आहे. एकीकडे पिसाळलेल्या श्वानांची दहशत आणि दुसरीकडे उपचारासाठी आवश्यक असलेली लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये भटक्या श्वानांची टोळकी वाढली आहेत. त्यांच्या निर्बीजीकरणासह लसीकरणाबाबत नगर परिषदेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. श्वानांचा पाठलाग केल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत.

या परिस्थितीमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.

शहरातील भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याबरोबरच त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण प्रभावीपणे राबवावे. तसेच नेर येथील शासकीय रुग्णालयात अँटी-रेबीज लशीचा नियमित आणि पुरेसा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande