वीजवाहिनीची तार तुटून सहा एकर ऊस जळून खाक
माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी शिवारातील घटना नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी बीड, 15 सप्टेंबर (हिं.स.) : माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी शिवारात गंगामसला सबस्टेशनकडून खरात आडगावकडे जाणाऱ्या मेन लाईनची तार तुटल्याने लागलेल्या आगीत तब्बल सहा एकर ऊस जळ
कडब्याला आग


माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी शिवारातील घटना

नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी

बीड, 15 सप्टेंबर (हिं.स.) : माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी शिवारात गंगामसला सबस्टेशनकडून खरात आडगावकडे जाणाऱ्या मेन लाईनची तार तुटल्याने लागलेल्या आगीत तब्बल सहा एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

छोटेवाडी शिवारातील गट क्रमांक 103 मधील शेतकरी एकनाथ माळेकर, हनुमंत माळेकर आणि भानुदास माळेकर यांच्या प्रत्येकी दोन एकर ऊस पिकाचे आगीत नुकसान झाले. गेल्या दीड महिन्यापासून परिसरात पाऊस नसल्याने पिके आधीच करपून गेली आहेत. अशा परिस्थितीत हाता-तोंडाशी आलेले ऊस पीक वीजवाहिनीची तार तुटल्याने लागलेल्या आगीत अवघ्या एका तासात जळून खाक झाले.

या घटनेमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे दुष्काळात तेरावा महिना आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. परिसरात अनेक ठिकाणी वाकलेले वीजखांब, लोंबकळणाऱ्या तारा तसेच तारांचे घर्षण होऊन आग लागण्याच्या घटना वाढत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ऊस जळून मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जळालेल्या ऊस पिकाची महावितरण कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, जळालेल्या ऊस पिकाची महावितरण आणि महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन तातडीने पंचनामा करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande