
यवतमाळ, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
उघड्यावर दारू, गांजा, वाढदिवसाच्या पार्ट्यांचा धुमाकूळ
सध्या क्रीडा संकुल मद्यपी आणि हुल्लडबाजांचा सुरक्षित अड्डा बनले आहे. येथे रोज रात्री दारू, गांजा आणि वाढदिवसांच्या पार्ट्यांचा धुमाकूळ सुरू असतो. याकडे पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पांढरकवडा येथील क्रीडा संकुलात सध्या चारशे व शंभर मीटर धावण्याचा ट्रॅक, इनडोअर हॉल यांसह अन्य बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंचा नियमित सराव पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. खेळाडूंची वर्दळ नसल्याने क्रीडा संकुलात सायंकाळनंतर शुकशुकाट असतो. याच शांततेचा गैरफायदा काही टवाळखोर व असामाजिक तत्त्वांचे तरुण घेत आहेत. रोज सायंकाळी आणि रात्री या दोन वेळेत तरुणवर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होतो. उघड्यावर दारू पिणे, सिगारेट ओढणे आणि गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन करणे असे प्रकार खुलेआम चालतात. याशिवाय रोज नवीन मुले एकत्र येऊन उशिरापर्यंत वाढदिवसाचे केक कापून धुडगूस घालतात. या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचे दुर्लक्ष राहिल्यास येथे भविष्यात मोठे भांडण किंवा प्राणघातक गैरप्रकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पांढरकवडा पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालून या उपद्रवी तरुणांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
नागरिकांसोबत अरेरावी क्रीडा संकुल परिसरातून जाणार्!या नागरिकांनी अथवा क्रीडाप्रेमींनी या हुल्लडबाजांना टोकण्याचा प्रयत्न केल्यास, ते सरळ मुजोरीवर उतरतात. ‘इथून पुढे जाऊन बसा, ’ असे सांगितले तर ’अरेरावी’ची भाषा वापरून अंगावर धावून जातात. त्यामुळे नागरिकही आता त्यांच्याशी बोलणे टाळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी