रत्नागिरी : विलवडे रेल्वेस्थानकावर ७० गावातील प्रवाशांचे रविवारी उपोषण
रत्नागिरी, 15 सप्टेंबर (हिं.स.) । कोकण रेल्वे मार्गावरील लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वेस्थानकावर परिसरातील ७० गावांमधील प्रवासी येत्या रविवारी, दि. २० सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.विलवडे रेल्वे प्रवाशी संघटनेच्या संघर्ष समितीने विलवडे र
रत्नागिरी : विलवडे रेल्वेस्थानकावर ७० गावातील प्रवाशांचे रविवारी उपोषण


रत्नागिरी, 15 सप्टेंबर (हिं.स.) । कोकण रेल्वे मार्गावरील लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वेस्थानकावर परिसरातील ७० गावांमधील प्रवासी येत्या रविवारी, दि. २० सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.विलवडे रेल्वे प्रवाशी संघटनेच्या संघर्ष समितीने विलवडे रेल्वे प्रवाशांच्या न्याय्य मागण्यांसाठी हे लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. विलवडे रेल्वे स्थानकासमोर रविवारी सकाळी ९ वाजता आंदोलनाला सुरुवात होईल.

विलवडे स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्सगंधा एक्स्प्रेस व कोचुवेली एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, विलवडे स्थानकावर दुसऱ्या फलाटाची उभारणी करावी, विलवडे स्थानकाल प्रवासी आरक्षण कोटा द्यावा, सावंतवाडी टर्मिनल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दण्डवते यांचे तैलचित्र विलवडे रेल्वे स्थानकावर लावण्यास मंजुरी द्यावी, खेड ते सावंतवाडीदरम्यान दैनंदिन पॅसेंजर सेवा सुरू करावी, अशा मागण्या या संघटनेने केल्या आहेत.

कोकणी माणसांच्या जमिनीतून कोकण रेल्वे जाते. महाराष्ट्राचा २२ टक्के हिस्सा असलेली कोकण रेल्वे कोकणाच्या विकासासाठी निर्माण झाली. पण कोकण मार्गे दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर गाड्या जातात. त्यांचा फायदा कोकणवासीयांना होत नाही. त्यामुळे आता हा अन्याय सहन न करता संघर्ष करायचे संघटनेने ठरविले आहे.विलवडे स्थानकावर अवलंबून असलेल्या सत्तर गावातील ग्रामस्थ एक होऊन उपोषणाला बसणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande