
धाराशिव, 16 सप्टेंबर (हिं.स.)धाराशिव जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे गंभीर सावट आहे. अशा पाश्र्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता साजरा करावा असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. यावेळी कोणीही हार- तुरे, पुष्पगुच्छ आणून सत्कार करू नये! तसेच फटाके अथवा इतर वाद्यांच्या गजरात कोणत्याही मिरवणूक काढू नयेत असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले आहे.
“मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा कोणत्याही व्यक्तीचा किंवा पक्षाचा दिवस नाही. हा आपल्या पूर्वजांच्या त्यागाचा, समर्पणाचा आणि संघटित संघर्षाचा गौरवदिन आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आपण समाजात मतभेद आणि कटुता वाढविण्याऐवजी संवादाचे वातावरण ठेवले पाहिजे.”
“मराठा समाजाच्या भावना मला समजतात. समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, धाराशिवची सामाजिक एकजूट आणि मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाची गौरवशाली परंपरा अबाधित राहावी, हीच माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरच्या पवित्र दिवशी कोणताही गैरसमज किंवा कटुता निर्माण होऊ नये, यासाठी समाजबांधवांनी सहकार्य करावे,” असे आवाहन सरनाईक यांनी केले.
“भगवा ध्वज उंच फडकत राहावा, समाजाचे मंदिर ज्ञान, एकता आणि सामाजिक कार्याचे केंद्र बनावे आणि शेतकऱ्याच्या बांधावर शासन पोहोचावे—हीच धाराशिवच्या विकासाची दिशा असावी,” अशी भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेण्यास आणि जिल्ह्यातील शेतकरी, युवक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis