
छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग एकच्या सभापती करुणा जाधव यांना कार्यालयीन कामकाजासाठी दालन उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने त्यांनी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन केले. महापालिका परिसरातील वाहनांच्या पार्किंगमध्ये झाडाखाली बैठक घेत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
प्रभाग सभापतींना कार्यालयीन कामकाजासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दालन उपलब्ध नसल्याने कामकाज करताना अडचणी येत असल्याचे सांगत करुणा जाधव यांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला.
या अनोख्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत अखेर करुणा जाधव यांना कार्यालयीन कामकाजासाठी दालन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला यश आले असून, दालनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis