शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी; महिनाभर लोकसहभागातून सेवेचा जागर
सेवा सेतू’पासून ‘जनसेवक महाकुंभा’पर्यंत विविध उपक्रम गाव-वॉर्डस्तरावर सामाजिक सेवेची चळवळ छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, प्रशासन आणि सामान्य नाग
शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी; महिनाभर लोकसहभागातून सेवेचा जागर


सेवा सेतू’पासून ‘जनसेवक महाकुंभा’पर्यंत विविध उपक्रम

गाव-वॉर्डस्तरावर सामाजिक सेवेची चळवळ

छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधील अंतर कमी व्हावे तसेच लोकसहभागातून सेवाभावाची व्यापक चळवळ उभी राहावी, या उद्देशाने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान राबविण्यात येणार आहे. ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सेवा सेतू’च्या माध्यमातून योजनांचा थेट लाभ

अभियानातील प्रमुख उपक्रमांपैकी एक असलेल्या ‘सेवा सेतू अभियान’ अंतर्गत प्रत्येक तालुक्यात सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्रतेनुसार नागरिकांना थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या माध्यमातून नागरिकांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शक्यतो शिबिराच्या ठिकाणीच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित केले जाणार आहे.

वनहक्क दाव्यांवर विशेष भर

अभियानाच्या कालावधीत वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांच्या बैठका घेण्यात येणार असून, नवीन दावे तसेच पूर्वी सादर केलेल्या दाव्यांमधील दुरुस्त्यांवर कार्यवाही केली जाणार आहे.

अभियानाच्या कालावधीत सर्व दावे निर्णयित करण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय वेळापत्रक तयार करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

गाव आणि वॉर्डस्तरापर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्यासोबतच लोकसहभागातून सामाजिक सेवेची चळवळ व्यापक करण्यासाठी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande