
जिल्हा परिषद, गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ
नाशिक , 18 सप्टेंबर (हिं.स.)। गुणवंत शिक्षक पुरस्कार हा गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदारी अधिक व्यापक करणारा आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपल्या शाळेपुरते कार्य मर्यादित न ठेवता परिसरातील शाळांमधील गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी आणि आपल्या अनुभवातून इतर शाळांमध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संस्कृती निर्माण करावी, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
नाशिक जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ २०२६ मध्ये ते बोलत होते. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ.जयकुमार आढे, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस ॲड नितिन ठाकरे, शिक्षणाधिकारी (योजना) सरोज जगताप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सालमेटी, सेवानिवृत्त शिक्षक संजय कळमकर, गटनेते तथा नगरसेवक अजय बोरस्ते यांच्यासह शिक्षक, शिक्षण समिती सदस्य, गुणवंत शिक्षकांचे कुटुंबिय व अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भुसे म्हणाले की, शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान देणारे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे मार्गदर्शक आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. दुर्गम पाड्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, स्थलांतरित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी पालकांशी संवाद साधणे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले विशेष प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी आहेत. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी लोकसहभाग आणि सीएसआरच्या माध्यमातून भौतिक सुविधा निर्माण करत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श निर्माण केले आहेत. अशा शाळांचे अनुभव इतर शाळांपर्यंत पोहोचवून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी असली तरी त्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, स्वच्छ व आकर्षक परिसर, रंगरंगोटी आणि आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. या कामांसाठी लोकसहभागातून शाळांच्या विकासाला चालना देण्यावर भर देणे आवश्यक आहे. पटसंख्या घटणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसमोरील आव्हाने आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे ही आगामी काळातील महत्त्वाची आव्हाने आहेत. शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या समन्वयातून या आव्हानांवर मात करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी पुढील दोन वर्षे अभ्यासाला समर्पित करावीत – ओमकार पवार
शिक्षणातून ज्ञानासोबत संस्कार, मूल्ये आणि शिस्तीची रुजवणूक होणे आवश्यक आहे. सुपर हंड्रेड साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील दोन वर्षे मोबाईल, सोशल मीडिया व अनावश्यक मनोरंजनापासून दूर राहून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले. ‘मिशन नवोदय’सारख्या उपक्रमांत जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. शिक्षकांच्या प्रयत्नांतून नवोदयसह विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दौऱ्यांच्या माध्यमातून व्यापक अनुभव देण्याचे उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
या गुणवंत शिक्षकांचा झाला सन्मान
१. बागलाण तालुका- माधुरी सुभाष पवार, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा अजमीर सौंदाणे २. चांदवड तालुका- सतीश भाऊसाहेब अहिरे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा काजीसांगवी ३ देवळा तालुका- सतीश गोविंदराव आहेर, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा आहेरवस्ती ४ दिंडोरी तालुका- भिलाजी माधवराव पाटील, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा उमराळे खुर्द ५ इगतपुरी तालुका- अवधुत रामदास खाडगीर, पदवीधर शिक्षक, जि.प. शाळा भरविर खुर्द ६ कळवण तालुका- सविता तानाजी भामरे, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा कळवण मुली नं. १ ७ मालेगाव तालुका- मीना निषा देवरे, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा सौंदाणे नं. १ ८ नांदगाव तालुका- गणेश पुंडलिक साळी, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा गंगाधरी मोठी ९ नाशिक तालुका- विवेक पुंडलिक खैरनार, पदवीधर शिक्षक, जि.प. शाळा महादेवपूर १० निफाड तालुका- गौरी राजेंद्र गायवन, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा तळेगाव वाट ११ पेठ तालुका- योगेंद्र गणपत बोरसे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा दोनवाडे १२ सिन्नर तालुका- श्री. प्रकाश दत्तु जगताप, मुख्याध्यापक, जि.प. शाळा धोंडबार १३ सुरगाणा तालुका- श्री. सुधाकर कृष्णा भोये, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा सुरगाणा नं. १ १४ त्र्यंबकेश्वर तालुका- श्री. संदीप दत्तात्रय गुंजाळ, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा वाघेरा १५ येवला तालुका- श्री. योगेश बाळासाहेब माकोणे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा दुगलगाव
यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या महानगरपालिका शाळा क्रमांक 18, आनंदवली येथील उपशिक्षिका श्रीमती कुंदा बच्छाव यांचाही सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI