पावसाने दडी मारल्याने अमरावतीवर पुन्हा पाणीटंचाईचे संकट
गेल्यावर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात 25.5 टक्यांची घट अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. काही दिवसांपूर्वी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला, तरी त्याचा भूजल पातळीवर अपेक्षित परिणाम झालेल
पाऊस गायब, पाण्याचा प्रश्न गंभीर; जिल्ह्यात टंचाईचे सावट


गेल्यावर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात 25.5 टक्यांची घट

अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. काही दिवसांपूर्वी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला, तरी त्याचा भूजल पातळीवर अपेक्षित परिणाम झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट घोंघावू लागले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला दिलासा देणारा पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागासह अमरावती शहराचीही चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत असून, तब्बल २४ लघु प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. याशिवाय दोन मध्यम प्रकल्पांमध्येही अत्यल्प पाणीसाठा असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये २५.५ टक्क्यांनी कमी जलसाठा असल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि औद्योगिक क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

जिल्ह्यातील ५६ प्रकल्पांमध्ये सध्या ६०.०१ टक्के जलसाठा आहे.यामध्ये सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५८.६६ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ९७.३३ टक्के होता.सात मध्यम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी ५५.०१ टक्के, तर ४८ लघु प्रकल्पांमध्ये ६९.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनासाठी जूनअखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. जून आणि जुलै महिन्यात २३९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली; मात्र त्यानंतर ऑगस्ट महिना अक्षरशः कोरडा गेला. पावसाच्या या दीर्घ खंडाचा परिणाम शेती पिकांवरही झाला आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत केवळ २२.२ मि.मी. पाऊस झाल्याने जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही.

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. तसेच ४८ लघु प्रकल्पांपैकी तब्बल २४ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून, काही प्रकल्प व बंधारे तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. या प्रकल्पांमधील खालावलेली पाणीपातळी प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. गतवर्षी मान्सून आणि परतीचा पाऊस दमदार झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब भरले होते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता मुबलक होती आणि रब्बी हंगामातील सिंचनाचाही प्रश्न निर्माण झाला नव्हता. यंदा मात्र पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने परिस्थिती उलट झाली आहे. येत्या काळात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली नाही, तर सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची भिस्त आगामी पावसासह परतीच्या पावसावर अवलंबून आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande