मंगळवेढा नगरपरिषदेत कर वसुलीच्या 6.57 लाखांचा अपहार; लिपिकाविरुद्ध गुन्हा
सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसूल केलेली रक्कम पालिका फंडात जमा न करता स्वतःकडे ठेवून 6 लाख 57 हजार 588 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नगरपरिषदेचे लिपिक हरिप्रसाद पांडुरंग देवकर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्
मंगळवेढा नगरपरिषदेत कर वसुलीच्या 6.57 लाखांचा अपहार; लिपिकाविरुद्ध गुन्हा


सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसूल केलेली रक्कम पालिका फंडात जमा न करता स्वतःकडे ठेवून 6 लाख 57 हजार 588 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नगरपरिषदेचे लिपिक हरिप्रसाद पांडुरंग देवकर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील लेखापरीक्षण अहवालात अपहाराची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.या प्रकरणी करनिरीक्षक महानंदा धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षात डीमांड क्रमांक 04 चे लिपिक हरिप्रसाद देवकर यांनी पाणीपट्टी, घरपट्टी तसेच अन्य करांची वसुली केली होती. या वसुलीच्या रकमेच्या हिशोबात 1 लाख 64 हजार 776 रुपयांची तफावत लेखापरीक्षणात आढळून आली.यानंतर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील संकलित कर व इतर करांच्या भरण्याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

त्यासाठी कक्षाधिकारी सचिन मिसाळ, लेखापाल अश्विनकुमार भोई, करनिरीक्षक तृप्ती रसाळ आणि लेखापरीक्षक गीता वडेकर यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली.या समितीने डीमांड क्रमांक 04 मधील कर वसुलीची तपासणी केली असता 6 लाख 52 हजार 70 रुपयांची तफावत असल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानंतर उपलब्ध नोंदी व तपासणीतून 6 लाख 57 हजार 588 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आल्याने देवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, या प्रकरणाचे पुढील लेखापरीक्षण सुरू असून त्यातून अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेतील कर वसुली आणि त्याच्या हिशोबाबाबत अधिक तपासणी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande