
सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या उन्नत मार्ग (उड्डाण पूल) प्रकल्पाला गती मिळाली आहे. हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून, त्यासाठी दहा शासकीय विभागांच्या अखत्यारितील ६३ हजार ९४९.९८ चौ.मी. शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
त्यामुळे प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.शहरातील तसेच आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनांच्या प्रवासास विलंब होत आहे. तसेच अपघातांचा धोका वाढण्याबरोबरच शहरातील प्रदूषणातही वाढ होत असून, एकूण वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर उन्नत मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमिनीचा विनामूल्य व आगाऊ ताबा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एनएचएआयला देण्यात येत आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाल्याने आता प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेस गती मिळण्याची शक्यता आहे.यासंदर्भातील शासन निर्णय ११ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड