
नांदेड, २ सप्टेंबर (हिं.स.) : सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भाजपचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पन्हाळगड निवासस्थानी भेट घेऊन देगलूर शहरातील रस्ते व पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी देगलूर शहरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने विविध मागण्यांचे निवेदन मंत्री भोसले यांना साद करण्यात आले.
शहराच्या मध्यवर्ती भागातील २१ मीटरचा रस्ता कायम ठेवून व्यापारी आणि नागरिकांचे हित जपावे, शहराबाहेरील प्रस्तावित ३३ मीटर रिंग रोडला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ चा बायपास जोडावा तसेच कारेगाव ते बागणटाकळी बायपास रस्त्याचे चौपदरीकरण करावे, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
या मागण्यांबाबत मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष प्र. बालाजी टेकाळे, उपनगराध्यक्ष अंकुश देसाई देगावकर, शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis