
एडीसीसी बँकेच्या दिरंगाईविरोधात वरुडच्या शेतकऱ्यांमध्ये संताप
अमरावती, 20 सप्टेंबर (हिं.स.)। शासनाने कर्जमाफी जाहीर करूनही त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळविताना वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) विविध शाखांमध्ये कर्जमाफीच्या प्रक्रियेत कथित दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार संबंधित बँक शाखांमध्ये जावे लागत आहे. कर्ज खातेदारांची सिबिल तसेच कर्जविषयक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी तब्बल आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाया जात असून आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ‘शासनाने कर्जमाफी जाहीर केली, मग शेतकऱ्यांना बँकेच्या दारात का थांबविले जात आहे?’ असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित शाखांमधील कामकाजाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक अथवा निष्काळजीपणामुळे दिरंगाई होत असल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आठ दिवसांचा अल्टिमेटम
विभागीय आयुक्त, अमरावती विभाग आणि जिल्हाधिकारी, अमरावती यांना तहसीलदार, वरुड यांच्यामार्फत १६ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. कर्जमाफीची प्रक्रिया आठ दिवसांच्या आत पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना रकमेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अंकुश बोडनासे, अमोल भुयार, मनीष धोटे, उमेश गणवीर, श्रीकृष्ण पाटील यांच्यासह समस्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी