
* कृषी विद्यापीठात तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे उद्घाटन
अकोला, 20 सप्टेंबर (हिं.स.) - जागतिक हवामान बदलाचे परिस्थितीत आता शेती व्यवसायात काळसुसंगत बदल क्रमप्राप्त असून महाराष्ट्र राज्याच्या कृषी उत्पादन वृद्धीसाठी आणि एकूणच कृषी क्षेत्राच्या ऊर्जेतावस्थेसाठी कृषी विद्यापीठांसह तत्सम संस्थाद्वारे विकसित प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करणे सोबतच त्यांचा अवलंब आणि वापर गरजेचा असल्याचे वास्तविक प्रतिपादन कृषिमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोलाचे प्रतिकूलपती दत्तात्रय भरणे यांनी केले. विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा प्रकल्प संचालक आत्मा, महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे आयोजित तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञानासह उत्तम प्रतीचे पीक वाण उपलब्ध करून पिक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशपातळीवर एकमेव अशी 1982 सालापासून सुरू असलेली शिवार फेरीची परंपरा आजही विद्यापीठ जोपासत असल्याचे सांगताना भरणे केवळ शेतकरी बंधू भगिनीच नव्हे तर विस्तारकर्ते, युवा वर्ग, लोकप्रतिनिधी आदी सर्वांनीच शिवार फेरी केली पाहिजे असे आवाहानात्मक प्रतिपादन आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात केले. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाकरिता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे अनेक पिक वाण व कृषीविषयक तंत्र विकसित करून विद्यापीठाने राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग सुकर केला असून दुष्काळी परिस्थितीतही पिकांची योग्य वाढ राखून भरीव उत्पन्न देणारे तंत्रज्ञान विकसित करून या विद्यापीठाने विदर्भाच्या शेतीचा कायापालट केला असल्याचे सांगताना आता मात्र शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाव्दारे विकसित तंत्रज्ञान वापरणे बाबत येथील शास्त्रज्ञांशी नियमित मनमोकळी चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगत शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद शाश्वत कृषी विस्ताराचा पाया असल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन देखील कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यापीठाच्या कृषी संशोधन व विस्तार कार्याची प्रशंसा करून विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या 'आदर्श दत्तक गाव' हा उपक्रम राज्याचे कृषी धोरण म्हणून अवलंबण्याची गरज प्रतिपादित केली.
या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळ पक्ष मुख्य प्रतोद रणधीर सावरकर, अकोला जिल्ह्याचे युवा खासदार अनुप धोत्रे, कृषि सचिव परिमल सिंग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू कर्नल प्रा.(डॉ). शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ.विलास खर्चे यांचेसह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कृषिमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या विविध प्रकाशनांसोबतच विद्यापीठाव्दारे राबविण्यात येत असलेल्या आदर्श ग्राम अभियानांतर्गत संकलित माहितीवर आधारित एका पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यासोबतच विद्यापीठांतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे आभासी पद्धतीने पायाभरणी तथा लोकार्पण करण्यात आले.
तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील एकंदर 22 एकर क्षेत्रातील विविध जिवंत पिक प्रात्यक्षिकांना मंत्री महोदयांनी भेट देऊन पाहणी केली. तीन दिवसीय शिवार फेरीत संपूर्ण विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींना निमंत्रित केले असून अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींना शिवार फेरीत सहभागी होण्याचे दृष्टीने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे पार्श्वभूमीवर महिला शेतकरी वर्गाला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी केले आहे.
शिवार फेरी वैशिष्ट्ये
यंदाचे शिवार फेरीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसह राज्य शासनाचा कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा, महाबीज, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), रिलायन्स फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, जिल्हा परिषद उमेद अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ आदींचा सहभाग आहे.
सन 1982 पासून शिवार फेरी हा विस्तार कार्यक्रम विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात येतो या निमित्ताने विद्यापीठ निर्मित पिकवाण तथा संशोधन शेतकरी बांधवांनी प्रत्यक्ष पहावे हा आयोजना मागचा मुख्य उद्देश आहे. गतवर्षी विदर्भातील 11 जिल्ह्यामधून एक लक्ष पेक्षा जास्त शेतकरी बंधू-भगिनींनी शिवार फेरीला भेट देत विद्यापीठ प्रक्षेत्रावर विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघितले व त्याचा आपल्या शेतीमध्ये नक्कीच उपयोग केला असेल.
शिवार फेरीला येणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींच्या सेवेकरीता गतवर्षीपासून स्वयंसहायता बचत गटांना अल्पपोहार, चहापान व भोजन व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिशय अत्यल्प दरात बचत गट सदस्य आपल्या सेवा पुरवित आहेत.
शिवार फेरीसाठी नोंदणी केलेल्या शेतकरी बंधू -भगिनींना विद्यापीठ प्रक्षेत्रावर शिवार फेरी केले जाते व दुपारचे सत्राचे चर्चासत्राचे माध्यमातून शेतकरी बंधू-भगिनी आपल्या शेतीविषयक शंकांचे निरसन करून घेतात.
* शिवारफेरीचे खास वैशिष्ट्यांमध्ये 25 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी 228 विविध पिक वाण, 15 तंत्रज्ञान शिफारशीसह थेट पीक प्रात्यक्षिके प्रत्येकी पहावयास मिळणार आहे.
* तसेच दरवर्षीप्रमाणे विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे 3200 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे सोबतच 02 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांचे पैदास कार बियाणे बिजोत्पादन कार्यक्रम पाहावयास मिळणार आहे.
* शिवार फेरीचे उद्घाटनानंतर रब्बी हंगामा करता बियाण्यांची विक्री सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
* खरीप शिवार फेरीचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी केवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचीच नव्हे तर आपल्या राज्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी,बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी सोबतच महाबीजसह एकूण 14 खाजगी कंपन्यांचे देखील प्रात्यक्षिके प्रत्यक्ष अवलोकनासाठी उपलब्ध करून दिली आहेत.
* मुळात यामागील उद्देश शेतकरी बंधूंना सर्व प्रकारचे लागवड तंत्रज्ञान व विविध पीक वाणांचे प्रत्यक्ष अवलोकन करता यावे व आपले गरजेनुसार सोयीनुसार त्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा.
* थेट पीक प्रात्यक्षिके शिवारफेरीचा एक भाग असून दरवर्षीप्रमाणे इतर 20 हूनही प्रक्षेत्र / विभागासह शेतकरी बांधवांना विद्यापीठाचे संपूर्ण प्रक्षेत्र पाहण्याकरता उपलब्ध राहणार आहे.
* अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींनी यंदा शिवार फेरीत सहभागी होऊन बदलत्या जागतिक हवामानाच्या परिस्थितीत आपली शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील कालसुसंगत बदल याची' देही याची डोळा बघून त्याचा अवलंब आपल्या शेतात कसा करता येईल याबाबत शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्या विद्यापीठाच्या या प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन विद्यापीठ परिवाराकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी