
यवतमाळ 20 सप्टेंबर (हिं.स.)।पाच दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी ‘फिक्स पॉइंट’ तैनात करण्यात येणार आहेत. यंदा जिल्ह्यात तब्बल २ हजार ६४३ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. यामध्ये शहरातील ६३४, तर ग्रामीण भागातील २ हजार मंडळांचा समावेश आहे. तसेच ५५४ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जनासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत, तसेच
मिरवणुकांमध्ये गर्दीचा ताण वाढू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने टप्प्याटप्प्याने विसर्जनाचे नियोजन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार असून संवेदनशील भागात ‘फिक्स पॉइंट’ उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि शांततेत गणरायाला निरोप द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी