
पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४ हजार ४६२ सदनिकांच्या सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सोडत २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
पुणे मंडळातर्फे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत सदनिकांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सुरुवातीला १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र, अनेक अर्जदारांना ऑनलाइन कागदपत्र पडताळणी करताना अडचणी येत असल्याने अर्ज सादर करण्याची मुदत एका महिन्याने वाढवून १५ ऑक्टोबर करण्यात आली आहे. त्यानुसार सोडतीची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.अर्जदारांना उत्पन्नाचा दाखला किंवा प्राप्तीकर विवरणपत्र सादर करण्याबाबतही यापूर्वीच सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ या दोन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला अथवा प्राप्तीकर विवरणपत्र अर्जासोबत सादर करता येणार आहे.आता अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ४,४६२ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार असून, यशस्वी अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु