शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी-प्रताप सिंह पाटील
छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रताप सिंह पाटील यांनी केली आहे. रुईभर येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाची
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रताप सिंह पाटील यांनी केली आहे. रुईभर येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी डॉ. पाटील म्हणाले की, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सोयाबीनचे शंभर टक्के पीक हातातून गेले असून, इतर पिकांसह उसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधव पूर्णपणे हतबल झाला आहे.शेतकऱ्यांनी कष्टाने आणि मोठा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होत आहे. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता वेळेवर वीज मिळत नाही, लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे आणि कर्जमाफीबाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.

एकीकडे पीक हातातून गेले, दुसरीकडे वीजेचा प्रश्न आणि डोक्यावर कर्जाचा बोजा; अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जगायचे तरी कसे?सरकारने आता पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. नुकसान प्रत्यक्ष शेतात दिसत असताना पंचनाम्यांची वाट कशासाठी पाहताय?धाराशिव जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी १ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्या. शेतकऱ्यांना आश्वासने नकोत; तातडीची, ठोस आणि प्रत्यक्ष मदत हवी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande