हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला वेग; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाचे उद्दिष्ट
पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निर्देशानुसार हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील रस्ते विकासाला आता वेग येणार असून, १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. या परिसरातील रस्ते पाया
Dudi


पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निर्देशानुसार हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील रस्ते विकासाला आता वेग येणार असून, १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. या परिसरातील रस्ते पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, भूसंपादन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

हिंजवडी आयटी कॉरिडॉरमधील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासह वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सहा प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे.या रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक भूसंपादन, रस्त्यांचे नियोजन आणि निविदा प्रक्रियेसाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक जमिनीपैकी ६० ते ७० टक्के जमीन संमतीने संपादित करून १५ ऑक्टोबरपर्यंत आगाऊ ताबा घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील शेतकरी तसेच जमीनमालकांसाठी प्रशासनाकडून गावपातळीवर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया, हस्तांतरणीय विकास हक्क (TDR), दोन किलोमीटरच्या परिघातील निवासी वापरासंदर्भातील नियम तसेच जमीनमालकांना मिळणारे विविध लाभ याबाबत माहिती देण्यात येणार आहे.हिंजवडी आयटी कॉरिडॉरमध्ये वाढत असलेली वाहतूक आणि त्यातून निर्माण होणारी कोंडी लक्षात घेता रस्ते विकासाची कामे वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande