
लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हेल्मेटचे वाटप
लातूर जिल्ह्यात वाढते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीबरोबरच सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. पोलिसांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा लातूर जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप केले आहे. गणेश मंडळांच्या या बदलत्या भूमिकेचे लातूर पोलीस दलाकडून कौतुक करण्यात येत आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसवेश्वर तरुण गणेश मंडळ, तोंडार तसेच युवा गणेश मंडळ, कुमठा खुर्द यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६१ नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. अहमदपूर पालीस ठाण्याच्या हद्दीतील मानाचा गणपती व्यापारी
गुमास्ता व हमाल गणेश मंडळाच्या वतीनेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, सर्व रक्तदात्यांना हेल्मेट देण्यात आले. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती गणेश मंडळ, मोतीनगर तसेच सुवर्ण गणेश मंडळ, सराफा लाईन यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७२ नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना यावेळी हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजस्थानी युवक गणेश मंडळ लक्ष्मीनारायण मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता यामध्ये २०० लोकांनी
सहभाग घेतला २०० लोकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. पोलीस स्टेशन किनगाव हद्दीमध्ये खंडाळी येथील राजमुद्रा गणेश मंडळ व ढाळेगाव येथील गणेश मंडळांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून हेल्मेट वाटप केलेले आहेत त्यामध्ये १२५ लोकांनी सहभाग घेतलेला आ हे. पोलीस स्टेशन औसा हद्दीमध्ये वीरशैव गणेश मंडळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून हेल्मेटचे वाटप केले सदर शिबिरामध्ये एकूण ६० लोकांनी रक्तदान केले सर्वांना हेल्मेट देण्यात आले.
मुरुड पोलीस स्टेशन अंतर्गत शंभूराजे गणेश मंडळ तसेच मुरुड चा महाराजा गणेश मंडळ आणि शिवगड गणेश मंडळ मुरुड यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून हेल्मेटचे वाटप केले यामध्ये एकूण २०० लोकांनी सहभाग नोंदवला २०० लोकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. तसेच देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय हनुमान गणेश मंडळ, बोंबळी खुर्द यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६० नागरिकांनी रक्तदान केले असून, त्यांनाही हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
यासोबतच आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८१ नागरिकांनी सहभाग घेतला. रक्तदात्यांना हेल्मेटसोबत वृक्षाची भेट देण्यात
आली. त्यामुळे रक्तदान, रस्ते सु रक्षा आणि पर्यावरण संवर्धन असा त्रिसूत्री संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या सर्व उपक्रमांमधून एकूण ११६० नागरिकांनी रक्तदान केले, तर रक्तदान करणाऱ्या नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव न साजरा करता रक्तदान, रस्ते सुरक्षा आणि नागरिकांच्या जीवनरक्षणाचा संदेश देण्याची गणेश मंडळांची भूमिका ही सकारात्मक बदलाची नांदी ठरत आहे
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी हेल्मेट वापराबाबत
जनजागृती करण्यात येत आहे. या प्रयत्नांना गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. विविध गणेश मंडळांनी पुढाकार घेत राबविलेल्या या समाजोपयोगी उपक्रमांचे लातूर पोलीस दलाच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील इतर गणेश मंडळांनीही या उपक्रमांचा आदर्श घेऊन रक्तदान, हेल्मेट जनजागृती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत आणि नागरिकांच्या जीवनरक्षणासाठी एक पाऊल पु ढे टाकावे, असे आवाहन लातूर पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis