
सोलापूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। मोबाईल आणि ऑनलाइन मनोरंजनाच्या युगात शाळकरी मुले तसेच तरुणांचा मोठा वेळ स्क्रीनवर जात आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या निमित्ताने माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पारंपरिक खेळांना पुन्हा उजाळा मिळत आहे. लेझीमच्या तालावर तरुणाई मैदानात उतरल्याचे चित्र विविध गावांत पाहायला मिळत आहे. गाण्याच्या तालावर शिस्तबद्ध कवायती सादर करताना तरुण आणि मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकसुरात होणाऱ्या लेझीमच्या हालचाली, गाण्याचा निनाद आणि खेळातील चपळाई यामुळे ग्रामस्थांचे लक्ष वेधले जात आहे. उंदरगाव आणि उपळाई बुद्रुक येथे लेझीमच्या खेळाला विशेष प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने तरुण तसेच शाळकरी मुले सहभागी होत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक खेळात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने मुलांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मोबाईल आणि ऑनलाइन मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात गणेशोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक खेळ, सांघिक सहभाग आणि शिस्तबद्ध कवायतींची परंपरा पुन्हा जिवंत होत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड