
सोलापूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद (धाराशिव) या बहुप्रतीक्षित नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला राज्य शासनाने पुन्हा आर्थिक बळ दिले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाच्या हिश्श्यातील २४० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
यापूर्वी या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून ३४० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. नव्या निधीमुळे प्रकल्पातील राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला आणखी गती मिळणार आहे.राज्यातील ग्रामीण तसेच तुलनेने अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती देऊन ते लवकर पूर्ण व्हावेत, या उद्देशाने राज्य शासनाने अशा प्रकल्पांमध्ये आर्थिक सहभागाचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद (धाराशिव) नवीन रेल्वे मार्गासाठी सुरुवातीला ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या प्रकल्पाची सुरुवातीची अंदाजित किंमत ९०४.९२ कोटी रुपये होती. त्यानुसार राज्य शासनाचा ५० टक्के हिस्सा ४५२.४६ कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातही त्यानुसार बदल होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड