
पाटणा, 21 सप्टेंबर (हिं.स.)। बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील सुल्तानगंज प्रखंडातून सोमवारी सकाळी अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. येथे तरैटा नारायणपूर वहियार परिसरात पुराच्या पाण्यात बुडून सहा मुलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील सर्व मुले कर्मा-धर्मा पूजेच्या पवित्र प्रसंगी पारंपरिक स्नान करण्यासाठी गेली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मृत मुलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गंगा नदीच्या वाढलेल्या जलस्तरामुळे वहियार येथील शेतांमध्ये पुराचे पाणी साचले होते. सोमवारी सकाळी विष्णू टोला आणि आसपासच्या परिसरातील मुले कर्मा-धर्मा सणानिमित्त स्नान करण्यासाठी तेथे पोहोचली होती. स्नान करताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मुले खोल पाण्यात गेली आणि एकापाठोपाठ एक बुडू लागली. आजूबाजूला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आणि स्थानिक गोताखोरांनी आरडाओरड ऐकून तातडीने बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर सर्व सहा मुलांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर सर्वांना मृत घोषित केले.
मृत मुलांचे वय १२ ते १४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी पाच मुले सुल्तानगंज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २७ मधील विष्णू टोला येथील रहिवासी होती. मृतांची ओळख पूजा, ज्योती, मिंकी, राहुल, आयुष आणि विकास अशी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह पंचनाम्यासाठी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule