शेतकरी प्रथम! संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री भरणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
नाशिक विभागातील पीक परिस्थितीचा आढावा; नाशिक, 24 सप्टेंबर (हिं.स.)। पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ‘शेतकरी प्रथम’ या
Farmers First!Reach the dam


Farmers First!Reach the dam


नाशिक विभागातील पीक परिस्थितीचा आढावा;

नाशिक, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ‘शेतकरी प्रथम’ या भूमिकेतून संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी प्रशासनाने थेट बांधावर जाऊन काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. नाशिक विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत पीक नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यमापन, मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग, पीक विमा दावे आणि वीजपुरवठ्यासह विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.

नाशिक विभागातील पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात ही बैठक कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांवचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार माणिकराव कोकाटे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृषिमंत्री श्री.भरणे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या ऐकल्या पाहिजेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन पातळीवर आढावा न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असा सूचना त्यांनी केल्या.

सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत असून, ‘शेतकरी प्रथम’ या भूमिकेतून सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पीक विमा आणि नुकसान भरपाईबाबत सकारात्मक पावले

पीक विम्याच्या नुकसान भरपाईबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार मदत मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. सॅटेलाईट इमेजच्या निकषांबाबत शिथिलता देण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दिलासा मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

पीक परिस्थिती लक्षात घेऊन मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. या माध्यमातून प्रत्यक्ष पीक नुकसानीचा अंदाज घेऊन पुढील मदतीचे नियोजन करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना शक्य ती लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या निकषांनुसार एनडीआरएफ अंतर्गत मदत मिळेलच; मात्र त्याची वाट न पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली.

शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक मदत कशी देता येईल, याचा विचार शासनस्तरावर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना झाला आहे, असे कृषिमंत्री श्री. भरणे यांनी संगीतले.

यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नियमित वीजपुरवठ्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी बैठकीत मांडला. शेतीसाठी किमान १२ तास वीजपुरवठा मिळावा, तसेच दिवसा नियमित वीज उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही कृषिमंत्री श्री. भरणे यांनी दिली.

पीक विमा, वीजपुरवठा आणि इतर स्थानिक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

संकट मोठे आहे; मात्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सर्व विभागांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा कसा देता येईल, यावर राज्य शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त केली. पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा विषय असून, त्यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे प्रलंबित दावे निकाली काढण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतरही विमा दावे प्रलंबित राहणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

अहिल्यानगरचे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनीही चारा, पाणी आणि वीजपुरवठा याबाबत चिंता व्यक्त केली. संपूर्ण जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.

नंदुरबारचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी, नंदुरबार जिल्ह्यात यंदा सर्वात कमी पावसाचे प्रमाण असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन या परिस्थितीचा सामना करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे ते म्हणाले.

धुळ्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी विमा रकमेच्या प्रीमियम बाबतचा मुद्दा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी अन्यायकारक ठरत असल्याचे सांगितले.

मंत्री श्री. भुसे यांनी, पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाल्याचे सांगितले. ई पीक पाहणी पोर्टल मध्ये येणाऱ्या अडचणीमुळेही शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप होत आहे. अशा अडचणीच्या वेळी सर्वांनी संवेदनशीलतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

मंत्री श्री. झिरवळ यांनी, वनपट्टे धारकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विभागातील पीक परिस्थितीचे सादरीकरण केले. विभागातील पर्जन्यमान, पावसातील खंड, पीक परिस्थिती, पाणीसाठा, भूजलस्थिती आणि संभाव्य पीक नुकसानीबाबत त्यांनी माहिती दिली.

धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पर्जन्यमानातील मोठ्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.

जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील पाणीसाठा, भूजलस्थिती, पीक परिस्थिती आणि पावसातील खंडामुळे अपेक्षित उत्पादनातील घट याबाबत माहिती दिली. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सध्या जिल्ह्यातील मग, सोयाबीन आणि उडीद पिकाची परिस्थिती वाईट असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील १२१ गावे आणि ४४१ वाड्यावस्त्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगाचे नियोजन केले असल्याची माहिती दिली तर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पावसाच्या खंडामुळे ७२ मंडळ बाधित होत असल्याचे सांगीतले.

या बैठकीस पाचही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. विविध लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि स्थानिक प्रश्न मांडले. पीक विमा, वीज, पाणी, नुकसानभरपाई, पीक कापणी प्रयोग आणि शासनाच्या विविध योजनांबाबत अनेक सकारात्मक सूचना करण्यात आल्या.

बैठकीस पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी, जलसंपदा , महावितरण, महसूल आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande