
बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
बीड, जालन्यात पीक परिस्थितीची करणार पाहणी ; २७ ला बीडच्या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण ; विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान परळी, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना दौऱ्यावर येत आहेत. कमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्या बीड व जालना जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध सामाजिक उपक्रम, संघटनात्मक बैठका, शिक्षक पुरस्कार वितरण, गुजर समाज मेळावा आदी विविध कार्यक्रमांना त्या उपस्थित राहणार आहेत. रविवारी २७ रोजी मुंडे यांच्या बीड येथील संपर्क कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे.
पंकजा मुंडे येत्या शनिवारी २६ रोजी परळीत असणार आहेत. यादिवशी सकाळी १०.३० वा. सावतामाळी मंदिर परिसरात संत रोहिदास महाराज यांचा कलश पूजन कार्यक्रम, सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान अंतर्गत औद्योगिक वसाहत सभागृहात रांगोळी स्पर्धा, अंगणवाडी सेविकेचा सन्मान आणि महिला रिक्षाचालकांना वाहन परवान्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता सेवा संकल्प अभियान अंतर्गत अंबाजोगाई येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात त्यांच्या उपस्थितीत चित्रकला, निबंध आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ सप्टेंबर : पीक परिस्थितीची पाहणी, बीड येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि विविध कार्यक्रम
रविवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंकजाताई परळीत भाजपा कार्यकर्त्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुपारी २.३० वाजता अंबाजोगाई-केज-नेकनूर परिसरातील पीक परिस्थितीची पाहणी करून त्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल निलकमलच्या बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. दुपारी ४.३० भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठक, सायंकाळी ५.३० वाजता केएसके महाविद्यालयात कल्पतरु बीड आयोजित गणेशोत्सव देखावा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता नगर रोडवरील श्रीराम मंगल कार्यालयात गुजर समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित मेळाव्यास त्या उपस्थित राहणार आहेत.
२८ सप्टेंबरला जालन्यात पीक पाहणी
सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील भानुदास सभागृहात ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ पशुवैद्यकांच्या पुरस्कार सोहळ्यास पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार आहेत असून त्यानंतर दुपारी २.३० जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis