गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
* १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल १५ ऑक्टोबरपर्यंत होणार वाहतुकीसाठी सज्ज * अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली प्रकल्‍पस्‍थळाची प्रत्‍यक्ष पाहणी मुंबई, 24 सप्टेंबर (हिं.स.) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाचा एक महत्‍
गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी उड्डाणपूल


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर


* १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल १५ ऑक्टोबरपर्यंत होणार वाहतुकीसाठी सज्ज

* अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली प्रकल्‍पस्‍थळाची प्रत्‍यक्ष पाहणी

मुंबई, 24 सप्टेंबर (हिं.स.) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाचा एक महत्‍त्‍वपूर्ण भाग असलेल्‍या गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान १.२६ किलोमीटर लांबीच्‍या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज या उड्डाणपुलाच्‍या कामाची प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, विविध निर्देश दिले.

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद,सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्‍या या संपूर्ण प्रकल्‍पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्‍यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येईल. तसेच, इंधन वापरात बचत, मुंबईच्‍या वायू गुणवत्‍ता निर्देशांकातही (AQI) सुधारणा होईल. एकूणच, मुंबईतील नागरिकांचे राहणीमान सुधारण्‍याच्‍या दिशेने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा एक महत्‍त्‍वपूर्ण उपक्रम आहे.

या प्रकल्‍प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान ३ × ३ मार्गिकेच्‍या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिंडोशी न्‍यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेल येथे उड्डाणपूल वळून दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. या पुलाचे बांधकाम एक स्‍तंभावर पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटचे सेगमेंटल बॉक्‍स गर्डर वापरून करण्‍यात आले आहे.

या पुलाचे मुख्य बांधकाम १०० टक्‍के पूर्ण झाले आहे. त्‍यात एकूण ३१ खांबांची उभारणी, एकूण ३० स्पॅन आदींचा समावेश आहे. खांबांवर तुळई बसविणे, डेक स्लॅबचे ओतकाम तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच मार्गांचे (Approach Roads) कामही पूर्ण झाले आहे. पुलाच्या उर्वरित कामांमध्ये रंगरंगोटी, दिशादर्शक फलकांची उभारणी, विद्युत खांब बसविणे, थर्मोप्लास्टिक मार्किंग, कॅट्स आयज तसेच ध्वनीरोधक (Noise Barriers) यांचा समावेश असून, ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतुकीसाठीची क्षमता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भार चाचणी (Load Test) घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून दिनांक १५ ऑक्‍टोबर २०२६ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सज्‍ज होईल.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या सर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. पुलाखालील परिसरातील सर्व रस्ते अडथळे (Barricades) तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करावा. परिसरातील राडारोडा व घनकचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ व वाहतुकीस सुरक्षित ठेवावा. पुलालगतच्या ७.५ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्यांचे (Slip Roads) काम तातडीने पूर्ण करावे. तसेच, पुलाची अंतिम कामे (Finishing Works) गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री. बांगर यांनी दिले. याशिवाय, पुलावरील व परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांशी आवश्यक समन्वय साधून नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.

प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. नरेश मेघराजानी यांच्‍यासह महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande