
रत्नागिरी, 25 सप्टेंबर (हिं.स.) । ग्राहक पंचायतीची वार्षिक बैठक येत्या रविवारी, दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी १ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
आजच्या काळात ग्राहकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाहने, मोबाइल फोन, त्यांचे रिचार्ज इथपासून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची खरेदी आपण रोजच करत असतो. या खरेदीत भेसळ नाही ना, मिळालेल्या वस्तूचा दर्जा योग्य आहे का या वैयक्तिक प्रश्नासोबतच सामुदायिक प्रश्न उपस्थित होत असतात. याबाबत कार्य करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात गेली सलग २५ वर्षे ग्राहक पंचायत कार्यरत आहे. या पंचायतीच्या माध्यमातून विविध ग्राहक केंद्री प्रश्न धसास लावण्याचे कार्य केले जात आहे.
सद्य)स्थितीत सायबर फ्रॉड, विमा कंपन्यांकडून रास्त क्लेम नाकारले जाणे, पर्यटन मंडळांकडून होणारी फसवणूक, गुंतवणूक कंपन्यांची फसवणूक इत्यादी गंभीर बाबी समोर येत आहेत. या अनुषंगाने व्यापक पद्धतीने ग्राहक जागरूकता तसेच न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे काळाची गरज ठरली आहे.
सध्या ग्राहक पंचायत अशा प्रकारच्या विविध प्रश्नांना प्रशासकीय, न्यायालयीन मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक व्यक्ती ग्राहक असून आपल्या अनुभवातून इतरांना सावध करण्यासाठी, न्यायासाठी ग्राहक पंचायत कार्यरत असून ग्राहकांनी या चळवळीत सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे कार्यवाह सत्यवान कोत्रे यांनी केले आहे. ग्राहक पंचायत सभासद होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या चळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी रविवारच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई यांनीही केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी