‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला रायगडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
१२ दिवसांत ५४ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी रायगड, २६ सप्टेंबर (हिं.स.) : ‘आरोग्यदायी नागरिक — सशक्त रायगड’ या संकल्पनेतून रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ मोहिमेला जिल्ह्या
A Strong Raigad! 54,000 citizens screened; 'Seva Sankalp' to continue until October 17.


१२ दिवसांत ५४ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी

रायगड, २६ सप्टेंबर (हिं.स.) : ‘आरोग्यदायी नागरिक — सशक्त रायगड’ या संकल्पनेतून रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १४ ते २५ सप्टेंबर या अवघ्या १२ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ५४ हजार १५२ नागरिकांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत उपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात तब्बल १ हजार २७४ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. यामध्ये २५ हजार ४९४ पुरुष, २४ हजार २९० महिला आणि ४ हजार ५९६ बालकांची तपासणी करण्यात आली. जनरल मेडिसिनच्या २४ हजार ८१५ रुग्णांसह नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, त्वचारोग, हृदयरोग, बालरोग तसेच कान-नाक-घसा यांसारख्या विविध आजारांवरील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा देण्यात आली.

हृदयविकाराचे वेळेत निदान व्हावे यासाठी ७ हजार ४२३ नागरिकांची ईसीजी तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर स्थिती आढळलेल्या ४६२ रुग्णांना पुढील अँजिओग्राफीसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. याशिवाय आभा कार्ड नोंदणी, गोल्डन कार्ड वाटप, रक्तदान आणि अवयवदान संमती यांसारखे उपक्रमही या मोहिमेदरम्यान राबविण्यात आले.

दरम्यान, पहिल्या टप्प्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अतिजोखमीच्या गरोदर मातांचे सर्वेक्षण, ‘ॲनेमियामुक्त रायगड’ मोहीम, शाळा व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी, क्षयरोग शोध मोहीम, तसेच सिकलसेल आणि कुष्ठरोग नियंत्रणासाठी तपासण्या करण्यात येत आहेत.

विशेषतः टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची पूर्वतपासणी तसेच आवश्यकतेनुसार मोफत उपचाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजारांची लक्षणे वेळेवर ओळखून उपचार व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेने गावपातळीपर्यंत तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक यंत्रणा पोहोचवली आहे. नागरिकांनी नजीकच्या उपकेंद्र, ग्रामपंचायत अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिराला भेट देऊन मोफत तपासणी करून घ्यावी,” असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande